गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

मोगरा

मोगरा

मी बोलक्या डोळ्यात या हरवून  जातो.
मी मोकळ्या केसात या गुंतून जातो..
नसली जरी आता तरी होशील माझी
मी जागती स्वप्ने अशी सजवून जातो.
रस्ता दिसे मैलो तिथे मग चालतो मी
मी आठवांना त्या असा जगवून घेतो.

मग एकटा बैसून रुसतो हसतो मी,
मी वेड हे माझे असे मिरवून घेतो.
तू प्रेम करते पावसाळी मोसमाला,
अन्आसवांनी तो मला भिजवून देतो
येईल आपुली रात ती गंधीत पळांची
तू माळलेला मोगरा कळवून जातो..

-चंदन तहसीलदार.

सेल्फी आणि स्वाक्षरी

सकाळी काही कामानिमित्त घराबाहेर पडलो. शक्यतो अश्या वेळी मी माझ्या धुंदीत असतो. समोरून कुणी ओळखीचे गेले तरी लक्ष नसतं. मी माझ्याच विचारात मग्न असतो. अर्थात मगाशी मी अश्या वेळी म्हटलं तरी "अशी वेळ" कायमच असते. मी कुठल्याही वेळी विचारांच्या तंद्रीतच असतो (आणि त्यामुळे अनेक घोटाळे पण होत राहतात.) पण त्याबद्दल नंतर, आज काय घडलं ते विशेष. स्टेशनला पोहोचलो तर एकाच्या बंदुकीची नळीचं टोक बॅगेच्या साईड पॉकेटच्या फाटलेल्या जाळीत अडकलं.
हो तुम्ही बरोबर वाचलंत. ती बंदुकीची नळीच होती. या वेळी कोण लवाजमा घेऊन चाललंय पहावं तर.. मी ढम्म थांबलो. मला लक्षात आलं की ही परिस्थिती माझीच नाही तर रस्त्यातल्या गर्दीतल्या प्रत्येक अणू रेणूची आहे. साक्षात... हो साक्षात सचिन..
(आता "कोण सचिन?" असे विचारल्यास पुण्यापेक्षाही भयंकर अपमान करण्यात येईल.) मी सचिन तेंडुलकर बद्दलच बोलतोय.
तर साक्षात आपल्या सचिनला पाहून डोळे भरून आले, ओठांवर एक सुंदर स्मित आले, उर अभिमानाने भरून आला. इतकं सगळं तर कॉलेजमधल्या सॅनोरीटाला बघून पण होत नव्हतं. (तिच्याबद्दलच्या पुढील प्रश्नांसाठी थेट संपर्क करावा.) मी ताबडतोब बॅगेतलं सचिनचं खास बनवून घेतलेलं टी शर्ट काढलं. मागच्या वेळी असाच अचानक सचिन भेटला तेव्हा टी शर्ट नव्हतं याची चुटपुट लागली होती. तेव्हापासून कायम ते बॅगेत घेऊन फिरतो. आज ते कामात आलं. २४ वर्षे सचिनच्या अचूक टायमिंगचं कौतुक करणाऱ्या लोकांनी आज माझ्या टायमिंगचं कौतुक करण्यासाठी टाळ्या वाजवल्या. अपेक्षित परिणाम साधला गेला. सचिनचं लक्ष माझ्याकडे गेलं. मागच्या भेटीत हात मिळवला होता पण फोटो आणि स्वाक्षरी राहूनच गेले होते. आज काहीही करून या टी शर्टवर सचिनची स्वाक्षरी घ्यायचीच असा मी पण केला. फासे पण माझ्या बाजूनेच पडत होते. त्याच्या स्ट्रेट ड्राइव्ह सारखंच एक चित्तवेधक हास्य करत मला त्याने सुरक्षा कवचात यायची परवानगी दिली. "वूsss" च्या गजरात जमावाने माझं अभिनंदन केलं. जवळ जाताच मी आधी सचिनचा हात हातात घेतला. मागच्या वेळी विमानतळावर भेट झाल्याचं सांगितलं. त्याच्या नम्र स्वभावानुसार त्याने ते आठवल्याचंही सांगितलं. मग आम्ही त्याच्या मोबाईलमध्ये एक सेल्फी घेतला. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, शर्ट वर सचिनची स्वाक्षरी घेणं.
एव्हाना गर्दी वाढू लागली. ट्रॅफिक पोलीस पण आले. माझ्याकडे तर त्यांनी इतक्या आदराने पाहिलं की वाटलं आता पुढच्या क्षणी "याच्या नावाने पुढची १० वर्षे पावती फाडायची नाही" असं लिहून देतील. पण गर्दी वाढल्याने सचिनसकट सर्वांचाच नाईलाज होत होता.
मी आता शर्ट काढण्याच्या तयारीत होतो. पण शर्ट ४ वर्ष जुना. मधल्या काळात अनेक पापलेट, सूरमई आणि चिकन तंदुरींनी माझ्या तब्येतीला हातभार (पोटभार) लावला होता. शर्ट निघता निघेना.. मगासाच्या बंदुकवाल्या राक्षकाला सांगितलं की मला मदत करु तर माझा हात पकडून मला म्हणाला..
..
..
...
....
"अहो, उठा, आठ वाजता उठवायला सांगितलं होतं ना तुम्ही.."  खळ्ळ खट्याक..!!
नवरा स्वप्नात पण आनंदी असलेला पाहवत नाही या बायकांना..
असो एका स्वप्नात फक्त दिसला, एकात हात मिळवला, आज सेल्फी पर्यंत मजल मारली. स्वाक्षरी पण मिळेलच कधीतरी.
पण लाखो लोकांना पडत नाही असं सुंदर स्वप्न मला पडलं या आनंदात दिवस छान जाईल.

- चंदन तहसीलदार 

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

आधुनिक गणेशउत्सव


मित्रांनो, जरा थांबा.. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरु केला तेव्हाची त्याची कारणं आणि आज त्या उत्सवाचं झालेलं इव्हेंट वगैरे वगैरे चावून चोथा झालेला विषय मला चघळायचा नाहीये.
उलट आज सुद्धा गणेशउत्सव साजरा करणं तितकेच आवश्यक आहे असा या लेखनाचा हेतू आहे.
गोंधळलात..?? बरोबर आहे, आता आपण राजकीय पारतंत्र्यात नाही आणि हल्ली लोकांना एकत्र यायला वेळही नसतो, आलेच तर त्यात गोंधळ(आवाजाचा.. विचारांचा नव्हे) होणार हे गृहीत. मग आता गणेश उत्सवाची गरज काय? असा प्रश्न पडून तुम्ही गोंधळु शकता पण तुम्हाला अधिक न गोंधळात पाडता मी माझे स्पष्टीकरण देतो.
मगाशी मी "राजकीय पारतंत्र्य" असा शब्द वापरला हे काही हुशार वाचकांच्या लक्ष्यात आले असेलच. (ज्यांचे चुकून राहून गेले, ते ही हुशारच आहेत बरं का?) पण म्हणजे अजून कुठल्या पारतंत्र्यात आहोत आपण?? वैचारिक पारतंत्र्यात..
आता हे काय बुवा नवीन??
अगदी साधं, रोजच्या जीवनातलं उदाहरण देतो.. अमुक अमुक मेसेज १० लोकांना पाठवा आणि १०जीबी डेटा फुकट मिळवा असे मेसेज हल्लीच तुम्ही फॉरवर्ड केले असतील.. नाहीतर व्हाट्सअप्पवर येणारे PF ऑफिस बद्दलचे मेसेज, एखाद्या अपघाताचा विडिओ वगैरे वगैरे आपण अगदी सहज फॉरवर्ड करतो. पण खरंच तो विडिओ त्याच अपघाताचा आहे की दुसरा जुना, किंवा खरोखरच आपण पाठवतोय तो दुवा (लिंक) त्याच संकेतस्थळाची (वेबसाईट) कि भलतीच? हे तपासण्याचे कष्ट आपण घेतो का? आणि जर नसू करत तर आपण फक्त साक्षर आहोत पण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आपण अजून विकसित नाही केली. अर्थात हे फक्त एक उदाहरण झालं. दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग , घटना घडतात जेव्हा आपण "हे असंच असतं" म्हणून डोळे मिटून विश्वास ठेवतो. आणि याचाच फायदा घेऊन आपल्याला लुबाडले जातं किंवा फसवलं जातं.
मला वाटतं या सगळ्या गोष्टींवर विचार करणं, चर्चा होणं आणि फक्त शहरातच नाही तर गावागावांमध्ये हा विषय, ही चर्चा पोहोचली पाहिजे. गणपती उत्सव हे या साठी एक खूप प्रभावी माध्यम ठरू शकतं.
माझं दुसरं कारण थोडं वादग्रस्त असू शकतं पण मला जे वाटतं ते मांडणं मला आवश्यकही वाटतं.
हल्ली आपला कुठला हि सण असला की वेगवेगळे मेसेज फिरू लागतात.. "दिवाळीत पैश्याची नासाडी नका करू. गरीब मुलांना ते जास्त उपयोगी पडतील" "गणपतीत मोठे देखावे, रोषणाई, मिरवणुका यावर खर्च नका करू, ते पैसे दान करा" "होळी मध्ये पाण्याची नासाडी नका करू. पाणी टंचाई आहे."
पण असेच मेसेज मी नाताळ किंवा ईदला पाहत नाही. "५०० रुपयांचा बकरा ५०००० ला खरेदी करू नका, ते पैसे दान करा" " बकरा कापून मग रक्त धुवायला हजारो लिटर पाणी लागतं, एक गाव एक बकरा कापा" "३१ डिसेंबरला DJ मुळे ध्वनी प्रदूषण होतं साजरा नका करू" असे मेसेज कधी पाहिलेत का? नाही नाही.. मी काही कट्टर संघ कार्यकर्ता किंवा शिवसैनिक, मनसैनिक वगैरे नाही पण एकाच विशिष्ट धर्माला जेव्हा लक्ष्य केलं जातं तेव्हा माझ्यासारख्या विचार करणाऱ्या माणसाला नवल वाटायलाच हवे. पण याच उत्तर ब्रिटिशांनी २०० वर्षांपूर्वीच दिले आहे. "एखाद्या समाजाला पराभूत, खच्ची करायचे असेल तर सर्वात आधी त्यांच्या संस्कृतीचं खच्चीकरण करा" अश्या अर्थाचं निवेदन लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश संसदेत केलं आणि ब्रिटिशांना भारत आणि इतर बरेच देश पराभूत करणं खूप सोपं गेलं. आजही तोच खेळ आमच्यासोबत खेळला जातोय का?
जर असं होऊ द्यायचं नसेल तर आपण गणेश उत्सवासकट आपले सगळेच सण जोरात साजरे करायला हवेत.. पण थांबा.. याचा असा अर्थ अजिबात नाही की आता करतो तसेच करा. आता आपण काहीतरी चुकतोय हे नक्कीच. आपल्या सणांना आपण इव्हेंट बनवलंय हे चूकच पण सण साजरे न करणं यापेक्षा ते परंपरेप्रमाणे साजरे करणं अधिक आवश्यक आहे. पुन्हा थांबा.. परंपरेप्रमाणे मध्ये पण एक मेख आहे. फक्त अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा असं न म्हणता त्या परंपरांमागचा अर्थ समजून घेऊन, कालसुसंगत पद्धतीने सण साजरे केले जावेत असं माझं ठाम मत आहे.
आणि म्हणूनच १८९२ मध्ये जितकी गणेशउत्सव साजरी करण्याची गरज होती तितकीच आजही आहे.

धन्यवाद.

आपला नम्र,
चंदन तहसीलदार.